छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरुळ लेणी म्हणजे भक्ती, कौशल्य आणि तेज यांचा पुरावा आहे, अशी भावना उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी व्यक्त केली. तसेच उपराष्ट्रपती धनखड यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी वेरुळ लेणीची पाहणी केली. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड या ही होत्या. वेरुळ लेणीची पाहणी केल्यानंतर जगदीप धनखड यांनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली. ‘आपल्या समृद्ध सभ्यता आणि आध्यात्मिक वारशाचे भव्य प्रतीक असलेल्या विस्मयकारक वेरुळ लेण्यांना भेट दिली. क्लिष्ट कोरीव काम आणि भव्य वास्तुकला ही भक्ती, कौशल्य आणि कलात्मक तेज यांचा पुरावा आहे. ज्याचे भारत नेहमीच घर आहे. खरोखर एक नम्र अनुभव!’ असे त्यांनी यात नमूद केले.
लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थनाउपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळ येथील घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. याविषयीही त्यांनी ट्विट केले. ‘ वेरुळ येथील पवित्र घृष्णेश्वर मंदिरात आज प्रगल्भ देवत्वाचा अनुभव घेतला. भगवान शिवाच्या १२ पूज्य ज्योतिर्लिंगांपैकी एक, येथील प्राचीन दगडी वास्तुकला आणि वातावरण माणसाला शुद्ध अध्यात्माच्या क्षेत्रात पोहोचवते. आपल्या महान राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली’ असे त्यांनी नमूद केले.