छत्रपती संभाजीनगर : विद्युतीकरणाच्या कामाने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन महिन्यांपूर्वी मनमाड (अंकाई)- छत्रपती संभाजीनगर-जालना या १७४ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आणि हा मार्ग इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला. मात्र, दोन महिन्यांनतरही इलेक्ट्रिक इंजिनची एकप्रकारे वीज ‘गूल’ झालेली असून, रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ मंजुरी अडकली आहे.
जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण होताच पहिल्यांदा जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस विजेवर धावेल, असे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले. इलेक्ट्रिक इंजिनमुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते. रेल्वेच्या इंधन खर्चातही बचत होते. दोन महिन्यांनंतरही ही रेल्वे विजेवर धावण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. मराठवाड्याकडे दक्षिण मध्य रेल्वेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. विद्युतीकरण होऊनही रेल्वे सुरू करण्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे रेल्वे संघटनांतून म्हटले जात आहे.
असे झाले रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण- अंकाई (मनमाड) - छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १११ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- छत्रपती संभाजीनगर - दिनागाव दरम्यानचे ५६ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- दिनागाव - जालना दरम्यानचे ७ कि.मी.चे विद्युतीकरण १७ जुलै रोजी पूर्ण.- जालना - परभणी - मुदखेड - धर्माबाद दरम्यानचे २४६ किलोमीटरचे विद्युतीकरण २०२३ अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य.
सर्व तयारी झाली, लवकरच विजेवर रेल्वेसर्व तयारी झालेली आहे. जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच विजेवर रेल्वे धावेल. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्य रेल्वेकडे धावते. त्यामुळे मध्य रेल्वेशीही समन्वय साधला जात आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूरी येताच इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावेल.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, दमरे