परभणी : प्रशासन लोकाभिमूख बनवून राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. रावते म्हणाले, नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत. त्यासाठी प्रशासकीय गतीमानता अभियानातील गती टिकून राहिली पाहिजे. २० आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या काळात हे अभियान राबविले जात आहे. यात कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपद्धतीचे सुलभीकरण, ई गर्व्हनन्स्, अनुत्पादक खर्चात काटकसर, महसूल उत्पन्न वाढविणे, नियम, अधिनियमाचे एकत्रिकरण आदी बाबींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रावते म्हणाले, प्रशासन अधिक लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी अभियान टिकून राहिले पाहिजे. निर्णय घेणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले. (प्रतिनिधी)
गतीमानता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा
By admin | Updated: August 17, 2015 00:09 IST