लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला १०० कोटींचा निधी दिला आहे. भाजपचे महापौर बापू घडमोडे यांनी वारंवार मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरठे झिजविल्यानंतर हा निधी प्राप्त झाला. महापौरांच्या कार्यकाळातच या कामांचे भूमिपूजन व्हावे या दृष्टीने बरीच धडपडही करण्यात आली. मात्र, शेवटपर्यंत प्रयत्न विफलच ठरले. शनिवार, दि.२८ आॅक्टोबर रोजी विद्यमान महापौरांचा कार्यकाळ संपत असून, २९ रोजी सेनेचे महापौर अडीच वर्षांसाठी आरूढ होणार आहेत. त्यांच्याच कार्यकाळात आता भूमिपूजन होणार, हे निश्चित.मागील दोन वर्षांपासून महापालिका शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रयत्न करीत होती. जानेवारी महिन्यात भाजपच्या महापौरांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत मुंबई दौरे सुरू केले. वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यावर १०० कोटी रुपये मिळविण्यात यश मिळाले. निधी मंजूर झाल्यानंतर भाजपमध्ये श्रेयासाठी जोरदार दावे-प्रतिदावे सुरू झाले. काही नेत्यांनी तर जालना रोडवर मोठमोठे होर्डिंग्ज लावून निधी आपणच आणल्याचा दावा केला. खास प्रदेशाध्यक्षांना महापौर बंगल्यावर निमंत्रित करून शंभर कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. दोन महिन्यांत ही कामे सुरू होतील, असेही सांगण्यात आले होते. रस्त्यांची यादी तयार करण्याच्या मुद्यावरूनही भाजपमध्ये अंतर्गत कलह रंगला. कशीबशी यादी अंतिम झाल्यावर निविदा काढण्यासाठी भाजपच्या मंडळींनीच खोडा घातला. अखेर शासनाची मंजुरी मिळवून निविदा काढण्यात आल्या. ७ नोव्हेंबर रोजी निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निविदा उघडणे, पात्र ठेकेदारांची निवड करणे, स्थायी समितीची मंजुरी घेणे या कामांसाठी नोव्हेंबर महिना जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बापूंच्या काळात रस्त्यांचे भूमिपूजन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:47 IST