खुलताबाद : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या म्हैसमाळ रस्त्याचे काम निधीअभावी बंद असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे, तसेच या खराब रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे या रस्त्याचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी म्हैसमाळ येथील ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
म्हैसमाळ हे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. येथील श्री गिरिजादेवी, बालाजी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. एका ठेकेदार कंपनीने खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे पहिल्या टप्प्यात काम पूर्ण केले आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात निधी उपलब्ध नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. कंपनीचे ४० कोटींची बिले थकल्याने दोन वर्षांपासून रस्त्याचे काम बंद झाले आहे. रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून, त्याचा येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे, तसेच या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पाठीच्या मणक्याचे आजार जडले असून, अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
म्हैसमाळ रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काम सुरू करावे. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- दिनेश अंभोरे, माजी उपसभापती
म्हैसमाळ
कोट
रस्त्याचे काम बंद असल्याने पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करून पर्यटकांची गैरसोय दूर करावी.
- योगेश फुलारे, हॉटेल व्यावसायिक
फोटो : म्हैसमाळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, खडी उखडली आहे.