लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिटीचौक परिसरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या पाठीमागील नाल्यात शुक्रवारी दुपारी पाच अल्पवीय मुले नालेसफाईचे काम करीत होती. दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर २.३० वाजेच्या सुमारास अचानक नाल्यात पाण्याचा मोठा लोंढा आला. पाण्याचा मोठा प्रवाह सर्व मुलांना वाहून नेणार तोच सर्वांनी एका सिमेंटच्या पोलचा आधार घेतला. मुलांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या हिंमतीने त्यांना बाहेर काढले.पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेकडून नालेसफाईला सुरुवात झाली नसल्याची ओरड नगरसेवकांकडून सुरू होती. खाजगी कंपनीच्या सहकार्याने यंदा नालेसफाई करण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. ही घोषणाही नेहमीप्रमाणे हवेत विरली. वॉर्ड कार्यालयाने कंत्राटदारांमार्फत नालेसफाई सुरू केली. किलेअर्क परिसरातून एक मोठा नाला सिटीचौक पोलीस स्टेशनच्या पाठीमागून बारूदगरनाल्याला जाऊन मिळतो. याच भागात महापालिकेचे एक व्यापारी संकुल आहे. मनपाचे आरोग्य केंद्रही याच इमारतीत आहे. शुक्रवारी कंत्राटदाराने टाऊन हॉल जयभीमनगर येथील पाच अल्पवयीन मुले नालेसफाईसाठी लावली होती. सकाळपासून सर्व मुले नालेसफाईचे काम करीत होते. दुपारी १.३० वाजता शहरात मोठा पाऊस झाला. पाऊस झाला तेव्हा नाल्यातील पाण्याची पातळी वाढली नाही. एका तासानंतर अचानक नाल्याला पूर आला. पाण्याचा मोठा लोंढा सफाई करणाऱ्या मुलांच्या दिशाने आवाज करीत येऊ लागला. हे पाणी पाहून सर्व मुले भयभीत झाले. सर्वांनी पटापट उड्या मारून नाल्यातील एका सिमेंटच्या पोलचा आधार घेतला. नाल्यातील पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याने सर्वांनी एकच आक्रोश सुरू केला. मुलांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दोरीच्या साह्याने सर्व मुलांना एकानंतर एक बाहेर काढले.
पाच मुलांची मृत्यूला हुलकावणी
By admin | Updated: June 10, 2017 00:15 IST