रामेश्वर काकडे, नांदेडएकेकाळी गावात चहाला दूध मिळायचे नाही, तेथे आता दिवसाकाठी जवळपास ९०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याने नायगाव तालुक्यातील मुस्तापूर गावात दूधगंगा वाहत आहे. यातून ग्रामस्थांना महिन्याकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागल्याने गावाची सर्वांगिण विकासाकडे वाटचाल सुरु आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनच्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमात सन १२-१३ मध्ये मुस्तापूर या गावाची निवड करण्यात आली आहे.गावामध्ये जेमतेम २९९ हेक्टर क्षेत्र लागवडीलायक असून कोरडवाहू क्षेत्र, मध्यम जमीन, कमी उत्पादकता, कमी उत्पन्नाची साधने यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होती. मात्र कोरडवाहू अभियानामुळे विविध विकासाच्या व उत्पन्नवाढीच्या योजना राबविण्यात येत आहेत.शेतकऱ्यांना शेतीसोबत जोड व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी १४७ म्हशी, ७ गट शेळ््या व २ गट कुक्कुटपालन इत्यादी पशुधन ५० टक्के अनुदानावर दिले आले. यासाठी ३१ लाख ५० हजारांचे अनुदान वितरीत केले. मुस्तापूरमध्ये दिवसाकाठी ९०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. सरासरी ३० रुपये भाव गृहीत धरल्यास एका दिवसात २७ हजार रुपयांचे तर महिन्याकाठी ८ लाख १० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. एकूण दुधापैकी ५०० लिटर दूध नायगाव, बिलोली, गागलेगाव, लोहगाव या ठिकाणी तर ३०० लिटर दुधाचे दही करुन बिलोली, नायगाव, नांदेडसह आंध्र प्रदेशातील निझामाबाद या शहरात नेले जाते. तर उर्वरित दुधाचे तूप व खव्वा करुन पाच शेतकरी गटामार्फत विक्री केल्या जाते. येथील गटाने २०१३ च्या धान्य महोत्सवात १०० किलो तुपाची विक्री केली. यामुळे गावातील रोजगाराचा प्रश्न सूटला असून प्रत्येक कुटुंबियांना आर्थिक विकास साधण्यास मदत होत आहे.येथे शंभर हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीकप्रात्यक्षिक घेतले. यासाठी हेक्टरी ७५०० रुपयाच्या ५० टक्के अनुदानावर निविष्ठा दिल्या. रॅन्डम प्लॉटनुसार हेक्टरी १८.५० क्विंटल उत्पन्न आले. पूर्वीपेक्षा उत्पन्नात १५ टक्के वाढ झालीे. गळीत धान्यविकास कार्यक्रमातंर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिक व शेतीशाळा घेतली. ५० हेक्टरवर उडीद व हरभरा प्रात्यक्षिक घेतले. १३ शेतकऱ्यांना पाईपलाईन तर ८ जणांना इलेक्ट्रॉनिक मोटारपंप, ९९ स्प्रे पंप वाटप केले. २० हेक्टर क्षेत्रावर ढाळीचे बांधबंधिस्ती १२ शेततळी, ८ विहिरींचे पुनर्भरण करण्यात आल्यामुळे सिंचनात वाढ होण्यास मदत झाली. २ दालमिल व ३ मळणीयंत्र देण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय ग्रामस्थांनी लोकसहभागातून तळ््यातील गाळ काढत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. २८०० घनमीटर साचलेला गाळ काढून ५ हेक्टर क्षेत्रावर टाकला आहे. तसेच लोकसहभागातून गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर चार वनराई बंधारे बांधले. यामुळे पाणी अडवण्यास मदत झाली असून श्रमदानातून ग्रामस्वच्छता मोहीमही हाती घेतली आहे. यावरुन कोरडवाहू क्षेत्रविकास कार्यक्रम योजना मुस्तापूरसाठी वरदान ठरली आहे.
मुस्तापूर गावात वाहतेय दूधगंगा
By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST