छत्रपती संभाजीनगर : दुरुस्तीसाठी उभी असलेली शिवशाही बस चक्क कर्तव्यावर घेऊन जात असतानाच स्पार्किंग होण्याची घटना मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारात शुक्रवारी दुपारी घडली. वेळीच अग्निशमन सिलेंडरचा मारा करून मोठी आग लागण्यापासून रोखण्यात यश मिळाले.
एसी आणि वायरिंगच्या दुरुस्तीच्या कामासाठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगारात शिवशाही (एमएच -०९, ईएम-९२०२)बस उभी होती. एका चालकाने नाशिकला कर्तव्यावर जाण्यासाठी अन्य शिवशाही बस घेण्याऐवजी दुरुस्तीसाठी उभी ही शिवशाही बस ताब्यात घेतली आणि आगाराच्या बाहेर पडू लागला. त्याच वेळी अचानक बसमध्ये स्पार्किंग झाली आणि एकच धूर निघायला लागला. हा प्रकार निदर्शनास पडतात सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी अग्निशमन सिलेंडरच्या मदतीने आग लागण्यापासून रोखले. या प्रकरणी सदर चालकाला चार्जशीट देण्यात आली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी दिली
ही घटना घडली नसती आणि बस तशीच कर्तव्यावर गेली असती तर प्रवासादरम्यान मोठा अपघात होण्याची भीती नाकारता येत नव्हती.