साहेबराव हिवराळे, औरंगाबादसततच्या दुष्काळामुळे पाण्याला अतिमहत्त्व आले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक जण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाला आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर बाटलीबंद पाण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे. काही जण फॅशन म्हणून तर काही जण आरोग्याच्या काळजीपोटी बाटलीबंद पाणी खरेदी करतात. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला खूप मागणी वाढली आहे. शहरात किमान एक लाखापेक्षा जास्त पाण्याचे जार, ३ लाख पाण्याच्या बाटल्या अन् पाणी पाऊच ५ लाखांपेक्षा जास्त विक्री होत आहेत. बाजार, यात्रा, बसस्थानक, प्रवासात सर्वात जास्त मागणी होत आहे. खेड्यातही पाण्याचे जार पोहोचले आहेत. पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर असे सीलमार्क बाटलीवर असते. पाणी विक्रीच्या कंपन्या बहुतांश ठिकाणी सुरू झाल्या आहेत. खेड्यात तर ग्रामपंचायतमार्फत पाणी फिल्टर करून २ ते ५ रुपयांत २० लिटर पाणी दिले जात आहे. मागणी वाढली असून, प्रवासात असताना वॉटर बॅग आता कोणी बाळगत नाही. कारण १५ ते २० रुपयांत थंड पाण्याची बाटली मिळते. प्रत्येक बाटलीबंद पाणी मिनरल नसते. त्याचे भावही वेगवेगळेच आहेत. याबाबत सर्वसामान्य प्रवाशांनी सर्वेक्षणातून आपली मते मांडली आहेत. विवाह समारंभातही पाण्याच्या जारची ‘धूम’ झाल्याचा निष्कर्ष निघतो. पाण्याची गुणवत्ता किती याबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ असून, अन्न औषधी विभागाचेही दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. पाणी येते कुठून? त्याची गुणवत्ता काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळच सुरू असल्याचे दिसते.प्रवासात कोणते पाणी पिता?या प्रश्नावर बाटलीबंद पाण्यास ८० टक्के लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे. पाणी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असल्याचे व पाणी जास्त वेळ थंड राहत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ हॉटेल व पाणपोईवर जाऊनच पाणी पितो, असे १० टक्के प्रवाशांनी म्हटले. कुठले रहिवासी? यावर जास्त प्रवासी हे खेड्यातील नसून त्यांची संख्या केवळ १० टक्के आहे. ९० टक्के शहरी प्रवाशांना पाणी बाटलीबंदच हवे असल्याचे आढळून आले. तुमचे कपडे आणि मोठ्या किमतीची गाडी पाहून जास्त पैसे मोजावे लागतात का? या प्रश्नावरहोय असे ८० टक्के प्रवासी व नागरिकांनी आपले मत नोंदविले. शहरात विकतच्या पाण्याची फॅशन झाली असून, मिळेल ते पाणी विकत घेतले जाते. हॉटेलचे बिल देताना बाटलीची वाढीव किंमत मोजावी लागते. गावाकडेही पाण्याचे जार येतात का?पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरच्या पाण्यापेक्षा आता जारच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. पण ग्रामीण भागात टँकरच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे ८० टक्के लोकांचे मत आहे. २० टक्के लोकांनी जारला पसंती दिली आहे. बाटलीबंद पाणी फॅशन झाली आहे काय? प्रवासात असताना बहुतेक जण बाटलीबंद पाणी खरेदीसाठी होकार देत असून, यास ८० टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. तर पैशाची बचत म्हणून पाणपोईवर व हॉटेलातील पाणी पिऊन प्रवास करणाऱ्यांपैकी २० टक्के लोकांनी पाणी खरेदी टाळल्याचे दिसते.
बाटलीबंद पाण्याची धूम...!
By admin | Updated: April 29, 2016 23:55 IST