- गणेश सोनवणेबिडकीन : पैठण तालुक्यातील फारोळा येथील गट क्र, ५६ मध्ये खासगी बिल्डरकडून उभारण्यात आलेल्या चार मजली इमारतीला अवघ्या पाच वर्षांत तडे गेले आहेत. नाला लेव्हल करून त्या जागेवर इमारत बांधलेली असल्याने ती एका बाजूला कललेली असून, तिला चक्क जॅकचा टेकू देण्यात आला आहे. बिल्डरने आपली फसवणूक केली असून, आमचे पैसे परत करा आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
फारोळा येथील गट क्रमांक ५६ मध्ये २०१९-२० मध्ये हरिकुंज सोसायटी उभारण्यात आली. तीन अपार्टमेंटमधे प्रत्येकी १६ फ्लॅट असून, एकूण ४८ कुटुंबे राहतात. परंतु, पै-पै जमा करून आणि बँक कर्ज काढून घेतलेल्या घराचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे आता त्यांच्या निर्दशनास आले आहे. पाच वर्षांतच या इमारतीला तडे गेले. २ ऑगस्टला जी-३ विंगेच्या इमारतीचे सिमेंट कोसळले व स्टील उघडे पडले. नाला सपाट करून त्याच जागेवर निकृष्ट बांधकाम केलेली इमारत एका बाजूला झुकली आहे. येथील रहिवासी हे जेमतेम परिस्थिती असलेले, खासगी कंपनीत काम करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या आहेत. त्यांच्या घरांचे हप्तेही अद्याप संपलेले नाहीत.
इमारत रिकामी करण्याची नोटीसहरिकुंज सोसायटीबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, मंडळ अधिकारी रवींद्र जोशी, तलाठी रवींद्र मुखेडे, ग्रामसेवक आशा तुपे यांनी अपार्टमेंटची पाहणी करून पंचनामा केला. सोसायटीतील रहिवाशांची बैठक घेऊन धोकादायक इमारत पूर्णपणे रिकामी करण्याची नोटीस दिली.
मंदिरात थाटला संसारभारत मंगे, अरविंद भुसारे, जगन्नाथ अकोशे, राजेंद्र कदम, राहुल जाधव, उत्तम चव्हाण, सुखदान दाभाडे, प्रतीक कोळपकर या आठ कुटुंबप्रमुखांसह एकूण तीस रहिवाशांनी धोकादायक इमारत सोडली आहे. त्यांचे साहित्य घरातच असले तरी ते आठ दिवसांपासून सोसायटीतील इमारतीत राहत असून, तेथेच झोपतात.
निकृष्ट दर्जाची घरे विकलीबिल्डर झुनझुनवाला यांनी आमची आर्थिक फसवणूक केलेली असून, निकृष्ट दर्जाची घरे विक्री केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सर्व रहिवाशांची मागणी आहे. आमची रक्कम लवकर परत करण्यात यावी, त्या पैशातून दुसरीकडे पक्की घरे घेऊ, अन्यथा तोपर्यंत सोसायटीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातच आम्ही राहू.- भारत मंगे, रहिवासी, हरिकुंज सोसायटी
रक्कम परत कशी देणार ?येथील १६ पैकी ८ कुटुंबांना राहण्यासाठी जागा देत आहे. उर्वरित कुटुंबांना पक्के घरे तयार होईपर्यंत घरभाडे द्यायला तयार आहोत. अपार्टमेंट खाली करून रहिवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. नगर रचनाचे अधिकारी पाहणी करून निर्णय देतील. मात्र, सर्व रहिवासी पूर्ण रक्कम परत मागत असून ती आम्ही कशी देणार ?- दीपक झुनझुनवाला, हरिकुंज सोसायटी, बिल्डर.