औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्यास पाठिंबा आहे; परंतु ओबीसीच्या आरक्षणावर घाला नको, यासाठी शनिवारी (दि.५ ) ओबीसी, व्हीजेएनटीच्या संयुक्त बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे, असे पत्रकार परिषदेत बाळासाहेब सानप, अरुण रोडगे यांनी जाहीर केले.
ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला वाटा देऊ नये, शासनाने त्यांना वेगळ्या कोट्यातून आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे. मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही त्यांच्यासोबत होतो. काही लोक गैरसमज करून ओबीसी आरक्षणातून हिस्सा मागत आहेत. ओबीसी आरक्षणात विविध जातींचा समूह आहे. त्यातही मराठा समाज आल्यास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना कसा वाटा मिळेल हा मोठा प्रश्न आहे. ओबीसी व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. भरती प्रक्रिया रखडल्यामुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विषयावर संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला समाजातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला सचिन डोईफोडे, योगेश खाडे यांची उपस्थिती होती.