उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असताना दारू पिऊन रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावी करीत उद्धट वर्तन करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबादेतील जिल्हा रुग्णालयात घडला असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील तन्मय राहूल जमाले (वय-४) या युवकाचा बुधवारी सायंकाळी हौदात पडल्याने बुडून मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर मयत बालकाचे पार्थिव उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते़ जिल्हा रुग्णालयात पार्थिव आणल्यानंतर त्याचे शवविच्छेदन वेळेत होवून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देणे गरजेचे होते़ मयताच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ़ रमेश प्रभू थोरात यांना शवविच्छेदन लवकर करून देण्याची मागणी केली़ त्यावेळी डॉ़ थोरात आणि नातेवाईकांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती़ त्यानंतर काही वेळाने अतिदक्षता विभागात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांशी डॉ़ थोरात उद्धट वर्तन करून अरेरावी करीत होते़ डॉ़ थोरात यांचे वर्तन पाहून ते दारू पिल्याचे लक्षात आले़ त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी थोरात यांना चांगलाच चोप दिला़ डॉ़ थोरात यांच्या बंधूंना हा प्रकार कळाल्यानंतर ते घटनास्थळी आले होते़ संतापलेल्या नागरिकांनी त्यांनाही चोप दिला़जिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर थोरात यांना मारहाण झाल्याचे समजल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुरेश करंजकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली़ यादरम्यान, शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत डॉ़थोरात यांची वैद्यकीय तपासणी करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, यापूर्वी त्यांनी एकही पेशंट तपासला नाही, नातेवाईकांना अरेरावी करून शिवीगाळ केली अशा तक्रारी केल्या़ नातेवाईकांचा संताप पाहून पोलिसांनी डॉ़ थोरात यांना ताब्यात घेवून ठाण्यात नेले़ ठाण्याच्या आवारात मध्यरात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी जमली होती़ या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यात आली असून, डॉ़ थोरात यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)डॉ़ थोरात यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्हा रूग्णालयात त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत़ पोलिसांनी हे रक्ताचे नमुने घेतले असून, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले़ तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़या प्रकरणात डॉ़ थोरात यांच्याविरुद्ध जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कोणती कारवाई केली ? याची माहिती घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांच्याशी संपर्क साधला़ मात्र, त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘हा कॉल यावेळी कनेक्ट केला जावू शकत नाही ’ असेच उत्तर मिळत होते़
‘सीव्हील’मध्ये डॉक्टरला चोप
By admin | Updated: June 17, 2016 00:30 IST