आखाडा बाळापूर : स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या लढ्यातील अनुभव व प्रत्येक क्षणाचे प्रवाह त्यांच्या प्रतिमेतून वाहतात. त्यांनी देशासाठी लढताना दु:खाचे क्षण झेलले. त्यांच्या यातनांचा इतिहास तरुण पिढीने विसरता काम नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.फ.मुं. शिंदे यांनी केले. .आखाडा बाळापूर येथील जि.प. कन्या शाळेच्या सभागृहात स्वा.सै. क्रांतीवीर दीपाजी पाटील यांच्या अ.भा. परसवाळे यांनी काढलेल्या तैलचित्राच्या अनावरण झाले. ेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वा.सै. भीमराव बोंढारे होते. प्रमुख उपस्थिती साहित्यिक प्राचार्य सावंत, माजी शिक्षण सभापती संजय बोंढारे, सपोनि पंडित कच्छवे, प्रा. उत्तमराव सुर्यवंशी, साहित्यिक नरेंद्र नाईक, बबन शिंदे, महेश मोरे, जावळे, देवदत्त साने आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शिंदे बोलत होते. खुमासदार काव्यात्म शैलीतून शिंदे म्हणाले की, कळमनुरी तालुक्यातील दाती सारख्या ग्रामीण खेड्यातून स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व करत निजामास सळो की पळो करून सोडणारे क्रांतीवीर दीपाजी पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. राष्ट्रभूमी त्यांचा श्वास होती. त्यांच्या लढ्याचे आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन विद्रोह करत आजच्या लबाडी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. पारतंत्र्यातून मुक्त व्हायला जे दु:ख सोसावे लागले. याचा इतिहास विसरता कामा नये; परंतु आजच्या पुढारी समाजव्यवस्थेने स्वातंत्र्य म्हणजे तोंड उघडण्याची सोय अशी परिभाषाच बदलून टाकली आहे. त्यामुळे कोणीही दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणार नाही. यावेळी त्यांनी समाजव्यवस्थेतील, शिक्षण, राजकारण, पोलिस, दारिद्र्य, बेकारी आदीवरही आपल्या काव्यात्म भाषणातून शिंदे यांनी प्रहार केला. प्रास्ताविक प्रा. उत्तम सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. देवदत्त साने यांनी केले. आभार शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले. (वार्ताहर)
स्वातंत्र्यलढा विसरता कामा नये
By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST