औरंगाबाद : जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या डीएमआयसी या औद्योगिक प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अडीच लाख बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागून या भागाची भरभराट होणार आहे, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी केले. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या प्रचारार्थ देवळाई येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, उमेदवार डॉ. देहाडे, फेरोज पटेल, करीम पटेल, साताऱ्याचे माजी सरपंच यशवंत कदम, तालुकाध्यक्ष बबन पेरे, वसीम पटेल, सरवर पटेल, नीलेश भाग्यवंत, प्रशांत सातपुते, सरदार पटेल नबाब पटेल, नगरसेवक शकील पटेल, राहुल सावंत, सलमान पटेल आदींची मंचावर यावेळी उपस्थिती होती. राजेंद्र दर्डा म्हणाले की, केंद्रात यूपीएचे सरकार असताना पर्यटन क्षेत्राला १८७ कोटींचा निधी दिला. त्या निधीतून वेरूळ-अजिंठा येथे विविध विकासकामे करण्यात आली. शहरात एक हजार पोलीस जवानांचे भारत बटालियन आणण्यात आले. वीज वितरणात सुसूत्रीकरण करण्यासाठी ड्रम प्रोजेक्ट राबविण्यात आला. त्यापाठोपाठ शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत डीएमआयसी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी उभारण्यात येईल. या प्रकल्पातून तब्बल अडीच लाख तरुणांना रोजगार मिळेल. संपूर्ण मराठवाड्यासह, नगर आणि जळगाव जिल्ह्यांतून रुग्ण येणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या अत्याधुनीकरणासाठी १०० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. आघाडी सरकारने लोकोपयोगी अनेक कामे केली. स्वच्छ प्रतिमेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राज्यात पुन्हा सरकार स्थापन करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून प्रतिसाद दिला. पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
डीएमआयसीमुळे अडीच लाख बेरोजगारांना रोजगार
By admin | Updated: October 9, 2014 00:49 IST