औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निवासस्थानाच्या आवारात निघालेल्या सापाला त्यांनी स्वत:च पकडले. परंतु जोखीम नको म्हणून साप पकडण्याची स्टिक शनिवारी घेतली व साप पकडण्याचे सोपे तंत्र त्यांनी जाणून घेतले.
साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तो अत्यंत गरजेचा मानला जातो. विभागीय आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारात बऱ्याचदा सरपटणारे प्राणी आढळले की सर्पमित्राला बोलवावे लागते. अनेकदा केंद्रेकर यांनीच जोखीम घेत सापाला पकडून वनविभागाकडे सोपविले आहे. वन्यजीव प्रेमीचे हे रूप पाहण्यास मिळाले. ‘फणा’ काढून उभा असलेल्या सापाला सहजजणे पकडून त्याला बाटलीत सापाला बाटलीत सुरक्षितपणे टाकले आणि सर्पमित्र यांच्याकडे सोपविले. परंतु अधिक जोखीम नको म्हणून आधुनिक स्वरूपात बनविलेली स्टिक (चिमटा), साप पकडताना लागणारा सुरक्षित बूटदेखील त्यांनी विकत घेतला आहे. सर्पमित्र नितीन जाधव यांनी दिलेल्या स्टिकचा वापर करून विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी अत्यंत सुरक्षितपणे सापाला कसे पकडायचे ते जाणून घेतले.
वन्यजीवप्रेमी असल्याने ते वन्यजीवांना जीव लावतात. चिकलठाणा येथे जखमी वानराला वनविभागाला सोपवून औषधोपचार केल्यानंतरच जंगलात सोडण्याचे सुचविले होते. नुकतेच त्या वानराला देवळाई जंगलात वनविभागाने सोडल्याचेही ताजे उदाहरण आहे.
प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातदेखील ते कायम जनतेत चर्चेत असतात. कोणतेही काम करताना अगदी मनापासून करावे, हीच अभिरुची त्यांची दिसते. शुक्रवारी डॉ. किशोर पाठक यांना त्यांनी बोलविले होते, त्यांच्या समक्ष सापाचे प्रात्याक्षिक केले तर शनिवारी सर्पमित्र नितीन जाधव यांना बोलविण्यात आले होते. त्यांनी सापाला पकडण्याचे अगदी साधे प्रात्यक्षिक करून दाखविले.
मीही साप पकडतो...
साप पकडण्याचा चिमटा डिपार्टमेंटला देणार का, असे विचारले असता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, असा काही विचार नाही. मी स्वत:ही साप पकडतो, बंगल्याच्या आवारात पावसाळ्यात साप निघण्याचे प्रकार वाढल्याने व साप पकडण्याचा चिमटा (स्टिक व बूट) असला पाहिजे. त्यात जास्त जोखीमदेखील नसल्याने तो घेतला आहे, तो कुणीही सहजपणे हाताळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
कॅप्शन..., १) बंगल्याच्या आवारात विभागीय आयुक्त साप पकडताना.
२) साप पकडण्याची ‘स्टिक’ विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना देताना डॉ. किशोर पाठक, सर्पमित्र नितीन जाधव.