बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे बुधवारी मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. शिक्षणात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदशाळेतील शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविले जाते. गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांची जिल्हा निवड समितीमार्फत पुरस्कारांसाठी निवड केली जाते. प्रत्येक तालुक्यातून एक माध्यमिक व एक प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवडला जातो. याशिवाय क्रीडा शिक्षकांसाठी एक विशेष पुरस्कार दिला जातो. वडवणी तालुक्यात माध्यमिक शाळा नाही. याशिवाय पाटोदा व अंबाजोगार्ई तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चालू वर्षी १९ पुरस्कार दिले जाणार आहेत. रोख ५०० रुपये, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान, प्राप्त प्रस्तावांना निवड समितीने मंजुरी दिली असून संबंधित शिक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याकडे पाठविले आहेत. मंजुरी दिल्यावर नावे घोषित करण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी कुलकर्णी म्हणाले़ (प्रतिनिधी)
जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे
By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST