परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या जि़प़ सदस्या मेघनाताई बोर्डीकर यांनी केला आहे़ जिल्हा परिषदेची मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली़ त्या सर्वसाधारण सभेत जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवर पंचायत समितीची इमारत व कर्मचारी निवासस्थान बीओटी तत्वावर उभारण्यासंदर्भात जोरदार चर्चा झाली़ मंजुरीच्या ठरावाला काँग्रेसने विरोध दर्शविला तर राष्ट्रवादीने ठराव मंजूर व्हावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केले़ या अनुषंगाने लोकमतशी बोलताना काँग्रेसच्या जि़प़ सदस्या मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे़ चांगल्या व पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे या पक्षाच्या नेत्यांना वावडे आहे़ यातूनच जि़प़तील उपमुख्य अभियंता मैनोद्दीन शेख नूर यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला़ यापूर्वीही जि़प़चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, अजय सावरीकर यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत पाठविण्यात आले़ या दडपशाहीच्या प्रकारामुळे जि़प़तील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ ही हुकूमशाही पद्धत जास्त दिवस चालणार नाही़ जनताही त्यांना माफ करणार नाही़ कुठलेही ठराव घ्यायचे असतील तर चर्चा करणे आवश्यक आहे़ पशूसंवर्धन विभागाच्या जागेच्या ठरावाबाबतही आपली हीच भूमिका आहे़ घाईने निर्णय घेण्याची गरजच काय आहे ? असेही यावेळी बोर्डीकर म्हणाल्या़ दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ (जिल्हा प्रतिनिधी)