औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर नर्सपदी पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याकरिता ९ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिवाजी मच्छिंद्र पाचोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय, आमखास मैदान येथे हा सापळा रचण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार नर्स राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेल्या एका शासकीय रुग्णालयात ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली औरंगाबादेतील शालेय आरोग्य तपासणी पथकामध्ये करण्यात आली. दरम्यान, त्यांचा अकरा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. हा अर्ज राष्ट्रीय आरोग्य मिशनचे जिल्हा समन्वयक शिवाजी पाचोडे यांच्याकडेगेला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीने पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यासाठी पाचोडे यांनी नर्सकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार नर्सची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. साध्या वेशातील पोलिसांनी पंचामार्फत या तक्रारीची खात्री केली. त्यानंतर लावलेल्या सापळ्यात पाचोडे यांना नर्सकडून ९ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यातआले. पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सापळ्याचे आयोजन केले आणि कर्मचारी अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, अमोल वडगावकर, मीरा सांगळे यांनी या सापळ्याच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. आरोपीविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला.
नर्सकडून लाच घेताना जिल्हा समन्वयक अटकेत
By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST