औरंगाबाद : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या औरंगाबादेतील बायपासचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार हे सोमवारी जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) जागेची पाहणी करणार आहेत. वाल्मी प्रशासनाने बायपासच्या नियोजित मार्गावर आक्षेप घेऊन त्यासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविलेला आहे.सोलापूर- धुळे महामार्गाचा नवीन बायपास शहराबाहेरून जाणार आहे. मात्र, वाल्मीने त्याला आक्षेप घेतला आहे. हा नियोजित मार्ग वाल्मी संस्थेच्या अगदी मध्य भागातून जाणार आहे. त्यामुळे संस्थेच्या कॅम्पसचे दोन भागांत विभाजन होणार आहे. शिवाय तेथील काही इमारतीही पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे नियोजित मार्ग मध्य भागातून नेण्याऐवजी तो एका बाजूने न्यावा, अशी वाल्मीची मागणी आहे. वाल्मीच्या या भूमिकेमुळे बायपासच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी महिनाभरापूर्वीच वाल्मी, जिल्हा प्रशासन, नॅशनल हायवे अॅथॉरिटी आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाल्मीच्या जागेची स्वत: पाहणी करून याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी सकाळी वाल्मीला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.
बायपासचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी करणार वाल्मीची पाहणी
By admin | Updated: March 1, 2015 00:10 IST