विठ्ठल भिसे, पाथरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर सुरू करण्यात आलेल्या मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सुविधांचा अभाव असल्याने पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. चालूवर्षी या शाळेत आठवीचा वर्ग सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश घ्यावा की नाही, असा प्रश्न पालकांमध्ये पडला आहे. या शाळेला नवीन जागा उपलब्ध न झाल्यामुळे जुन्याच इमारतीत सुरु करण्यात येणार असल्याने आणखी समस्या वाढणार आहेत. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर मॉडेल इंग्लिश स्कुल सुरु करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. सुशोभित इमारत, निवासस्थानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेला ५० लाख रुपयांची सुरुवातीला तरतूदही केली. शासनाच्या मोकळ्या पाच एकर जागेमध्ये मॉडेल स्कुल नवीन इमारत बांधून सुरु करणे अपेक्षित होते. परंतु, पाथरीत मॉडेल स्कुलसाठी मागील दोन वर्षांपासून जागेचा प्रश्न सुटला नाही. सहाव्या वर्गापासून सुरु झालेले मॉडेल इंग्लिश स्कुल शहरातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्ग खोल्यात सुरु करण्यात आली. सहावी आणि सातवीचे वर्ग या जुन्या इमारतीत कसेबसे भरविण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षापासून आठवीचे वर्ग या शाळेमध्ये सुरु होणार आहेत. त्यामुळे पूर्वी दोन वर्गासाठी दोन खोल्या होत्या. आता आठवीच्या वर्गासाठी मोडकळीस आलेली वर्ग खोली पुन्हा ताब्यात घ्यावी लागणार आहे. मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध होतील, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, या अपेक्षेने मागील दोन वर्षापासून पालकांनी आपली पाल्या या शाळेत घातली आहेत. मॉडेल स्कुलच्या जागेचा प्रश्न सुटत नसल्याने या शाळेत प्रवेश द्यावा की नाही, असा प्रश्न पडला आहे. शासनाचा उद्देश चांगला पण... - मगर राज्य शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मॉडेल इंग्लिश स्कुल सुरु केले. पालकांच्या अपेक्षाही वाढल्या. शासनाचा उद्देश चांगला असला तरी या तालुक्यातील शाळेच्या जागेचा प्रश्न न मिटल्यामुळे पालकांचा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया अॅड.ज्ञानेश्वर मगर यांनी व्यक्त केली. ‘दुसर्या शाळेचा शोध घ्यावा लागेल’ गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. दोन वर्षात सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत. पुढेही मिळतील की नाही, याची शाश्वती नसल्याने आता पाल्यांना दुसर्या शाळेत प्रवेश द्यावा लागणार असल्याची प्रतिक्रया प्रभाकर पान्हेरे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी लक्ष घालतील का ? मॉडेल इंग्लिश स्कुलच्या जागेचा प्रश्न दोन वर्षांपासून रखडला आहे. तालुकास्तरावर अद्यापही हा प्रश्न मिटला नसल्याने पालकांमध्ये नाराजी दिसून येऊ लागली आहे. चांगल्या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने आता जिल्हाधिकारी एस.पी.सिंह या शाळेचा प्रश्न मार्गी लावतील काय? अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.
पाथरी येथील मॉडेल स्कुलच्या समस्या न सुटल्याने पालकांत नाराजी
By admin | Updated: June 2, 2014 01:08 IST