औरंगाबाद : मे महिना उजाडला, की जिल्हा परिषदेत बदल्यांचा बाजार गरम होतो. यंदा दि. १६ मेपर्यंत आचारसंहिता असून बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांतून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर १२ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामुळे बदल्यांची सर्वाधिक चर्चा व गडबड गोंधळही येथे होतो. विशेषत: शिक्षकांच्या बदल्या अधिक प्रमाणात गाजतात. यावर्षीही शिक्षक संघटनांनी बदल्यांची चर्चा घडवून आणणे सुरू केले आहे. प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघाचे नेते संभाजी थोरात, राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, एस. टी. पाटील, बाळकृष्ण तांबारे यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची रविवारी भेट घेतली. शिक्षकांच्या तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्या करू नयेत, यासाठी आग्रह धरला. संघाच्या या मागणीला ग्रामविकासमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचा दावाही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. याशिवाय विनाअट तालुक्याबाहेर आपसात बदली करावी, जेणे करून मागच्या वर्षी प्रशासकीय बदल्यांत गैरसोय झालेल्या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या तालुक्यात येणे सोपे होईल, विनंती बदलीसाठी ३ वर्षांची अट असावी, महिला शिक्षकांना बदल्यांमध्ये सवलत द्यावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. संघाचे औरंगाबाद तालुकाध्यक्ष रमेश जाधव, प्रवीण पांडे, राजेश पवार आदींनी हे पत्रक प्रसिद्घीस दिले आहे. (लोकमत ब्युरो)
जिल्हा परिषदेत बदल्यांची चर्चा सुरू
By admin | Updated: May 7, 2014 00:37 IST