औरंगाबाद : करवसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ चा वसुली आढावा प्रशासकांनी घेतला.
आढावा बैठकीत संबंधित विभाग प्रमुख, पालक अधिकारी, वाॅर्ड अधिकारी तसेच सर्व वसुली कर्मचारी उपस्थित होते. मागील काही महिन्यांमध्ये वसुलीत प्रगती न झाल्याने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे वसुलीच्या कामात बेजबाबदारपणा आणि दिरंगाई केल्याचे दिसल्यास संबंधितास निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे आदेश त्यांनी दिले. करवसुली करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली किंवा त्यास अतिरिक्त कार्यभार देऊ नये असे आदेशही त्यांनी दिले. यावेळी प्रशासकांनी प्रत्येक वसुली लिपिक आणि कर्मचारी यांच्याकडे आतापर्यंत काय काम केले याची विचारणा केली. मालमत्ता कर, पाणीपट्टीचे डिमांड बिल वाटपच केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरही त्यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर प्रभावीपणे करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे यांची उपस्थिती होती.