औरंगाबाद : मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगारातील पंपातील डिझेल संपल्याने सोमवारी अनेक मार्गांवरील बस जागेवरच उभ्या राहिल्या. परिणामी, प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. कर्तव्य मिळण्याच्या प्रतीक्षेत चालक-वाहकांना तासंतास ताटकळावे लागले.
मध्यवर्ती बस स्थानकातील पंपात रविवारी डिझेल संपले. बुकिंग करण्यास विलंब झाल्याने आणि रविवार असल्याने डिझेल उपलब्ध झाले नाही. सोमवारीही दिवसभर डिझेल आले नाही. सकाळच्या फेऱ्यांसाठी पहाटे ५ वाजता आलेल्या चालक-वाहकांना कर्तव्य मिळाले नाही. दुपारी आलेले कर्मचारीही आगाराच्या प्रवेशद्वारासमोर बसून होते. या सगळ्यात डिझेलअभावी निजामाबाद, नाशिक, धुळे, पुणे यांसह अन्य मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द झाल्या. ज्या बसमध्ये डिझेल होते, त्याच बस रवाना झाल्या. वाहतूक मार्गावरील आगारांतूनही डिझेल उपलब्ध होत नसल्याने बसेस पाठविण्याचे टाळण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सगळ्यामुळे कर्तव्यावर येऊनही हजेरी लागणार नसल्याविषयी चालक-वाहकांनी नाराजी व्यक्त केली.
कारवाई केली जाईल
विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, बसमध्ये डिझेल आहे. सायंकाळी उशिरा डिझेल प्राप्त होईल. चालक-वाहक जर बसून राहिले असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
-----
फोटो ओळ...
मध्यवर्ती बस स्थानकातील डिझेल पंप सोमवारी बंद होता. डिझेलच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या बस.