औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. सोमवारी पाचव्या माळेला दिवसभर लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन यात्रेतील मनोरंजनाचा आनंद लुटला. कोणी सहपरिवार, तर कोणी आपल्या मित्र-मैत्रिणीच्या गटासोबत दर्शनासाठी येत होते. सायंकाळी शेकडो दिव्यांच्या झगमगाटात कर्णपुरा उजळून निघत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून जिची ख्याती आहे, अशी कर्णपुरा यात्रा डोळे भरून पाहिल्याशिवाय शहरवासीयांचा नवरात्रोत्सव साजराच होत नाही. नवरात्रोत्सव व कर्णपुरा यात्रा हे मागील ३०० वर्षांपासूनचे समीकरणच बनले आहे. ही प्राचीन यात्रा आजही तेवढ्याच उत्साहात भरविली जाते. पंचवटी चौकापासून कर्णपुऱ्यात जाताना उंच आकाशपाळण्यानेच भाविकांचे स्वागत होते. येथे देवीच्या मंदिराकडे जाताना भाविक यात्रेत कुठे थांब्यायचे, मनोरंजनाचे कोणते खेळ बघायचे, कुठे श्रमपरिहार करायचा याचे मनात मनसुबे बनवितात. यात्रेदरम्यान मध्यभागी उजव्या बाजूस असलेले पंचमुखी हनुमान, विठ्ठल-रखुमाई व शनि महाराजांचे दर्शन घेऊन नंतर देवीच्या मुख्य मंदिराकडे जातात. रांगा लावून देवीचे दर्शन, त्यानंतर पाठीमागील बालाजी मंदिराचे दर्शन घेऊन झाले की, नंतर सर्व जण यात्रेत सहभागी होतात.
कर्णपुरा यात्रा भाविकांनी बहरली
By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST