औसा : तालुक्यातील तावरजा नदीच्या काठी उटी बु़ हे गाव़ गावात जगदंबादेवी मंदिर असून दर महिन्याच्या प्रत्येक नवमीला मंदिरात होमहवन केले जाते़ या होमामध्ये निजामाने शाल आणि श्रीफळ अर्पण केले होते़ त्यामुळे उटी बु़ येथील जगदंबा देवीही सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून औसा व पंचक्रोशीत ओळखली जाते़आख्यायिका अशी की, औशापासून १२ कि़मी़़ अंतरावर तावरजा नदीकाठी उटी बु़ आणि उटी खु़ ही दोन गावे झाल्यानंतर उटी बु़ औसा तालुक्यात तर उटी खु़ लातूर तालुक्यात पुनर्वसित झाले़ त्यामुळे उटी बु़ ग्रामस्थांनी जुन्या गावातील देवीचे मंदिर नवीन गावात बांधले व येथेही देवीची प्राणप्रतिष्ठापना केली़ उटीतील एका भक्ताला देवी प्रसन्न झाली़ देवीने त्याला सांगितले की मी प्रसन्न झाले असून, तुळजापुरहून मी तुझ्या घरी येणार आहे़ पण एक अट आहे की, तु घरात जाईपर्यंत मागे वळून पहायचे नाही़ या भक्ताने हो म्हणून तो चालू लागला आणि गावाच्या जवळ आल्यानंतर उत्सुकतेपोटी त्याने मागे वळून पाहिले़ त्याचठिकाणी मागे येत असलेली देवी अदृश्य झाली़ या ठिकाणावर ग्रामस्थांनी देवीचे मंदिर बांधले आणि उटी बु़ येथील ही देवी आज सर्वधर्माचे श्रद्धास्थान बनली आहे़ जगदंबा देवीच्या या मंदिरात प्रत्येक नवमीला होमहवन करण्याची परंपरा आहे़ निजामकाळात असाच एक होमहवनाचा कार्यक्रम सुरु होता़ यासाठी एक व्यक्ती होमात अर्पण करण्यासाठी शाल व श्रीफळ आणण्यास गेला़ पण तो वेळेवर येत नसल्याचे पाहून उपस्थित भाविकांनी निजामाने देवीला अर्पण केलेली शाल व श्रीफळ होमात टाकले हे पाहून निजाम संतापला आणि त्याने नागरिकांच्या अटकेचे फर्मान सोडले़ ग्रामस्थांनी देवीचा धावा केला़ एकाने पेटत्या होमकुंडात हात घातला आणि निजामाची ती शाल व श्रीफळ जशासतसे बाहेर काढली़ त्यानंतर बरीच वर्षे निजामाकडून देवीच्या होमाला शाल आणि श्रीफळ अर्पण करण्यासाठी येत असे़ (वार्ताहर)
जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदीयाळी
By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST