औरंगाबाद : खंडणी वसुली, प्राणघातक हल्ले, विनयभंग, चोऱ्या, लुटमाऱ्या करणारा पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुंड नारायण ऊर्फ अरुण सुभाष साळवे (उस्मानपुरा) याला अखेर पोलीस आयुक्तांनी ‘एमपीडीए’खाली स्थानबद्ध केले. आदेश जारी होताच गुन्हे शाखा पोलिसांनी साळवेची हर्सूल कारागृहात रवानगी केली.साळवेविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २ गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षाही झालेली आहे. बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, घर बळकावणे, सरकारी नोकरांवर हल्ले करणे, धमकावणे, लुटमारी करणे, विनयभंग करणे, अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. आपल्या या गुन्हेगारी कारवायांच्या जोरावर गेल्या काही महिन्यांपासून त्याने दहशत निर्माण करून एकनाथनगर, मिलिंदनगर, पीरबाजार, उस्मानपुरा या भागातील नागरिकांकडून खंडण्या वसुली सुरू केलेली होती. त्याच्या वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा म्हणून २०१४ मध्ये त्याला औरंगाबाद शहरातून हद्दपारही करण्यात आले. मात्र त्यात सुधारणा झाली नाही. दिवसेंदिवस त्याच्या गुन्हेगारी कारवाया वाढतच चालल्या होत्या. त्यामुळेच शेवटी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी साळवेविरुद्ध ‘एमपीडी’ करून त्याच्या स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. आदेश जारी होताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, जमादार द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, नवाज पठाण, महेश कोमटवार, आशा केंद्रे यांनी साळवेची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
कुख्यात नारायण साळवे ‘एमपीडीए’खाली स्थानबद्ध
By admin | Updated: March 31, 2015 00:40 IST