औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मतमोजणीसाठी विभागीय प्रशासनाने महिनाभर कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले; परंतु त्याचा काहीही परिणाम गुरुवारी मतमोजणीदरम्यान दिसून आला नाही. निरक्षर असल्याप्रमाणे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम करत असल्याने अनेक चुका होत गेल्या आणि मतमोजणीची गती मंद झाली.
सहायक निवडणूक अधिकाऱ्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांना जाहीरपणे मतमोजणीला गती देण्याच्या सूचना कराव्या लागल्या; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. राज्यातील इतर निकाल हाती आले; पण येथील निकालाची पहिली फेरीच रात्री ९ वाजता जाहीर झाली.
केंद्रेकर यांनी कडक भाषेत वारंवार सूचना करूनही मतमोजणीदरम्यान चुका होत गेल्याने विलंब झाला. मतपत्रिका व्यवस्थित न हाताळणे, चुकीच्या मार्किंग करणे यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसले.
पहिल्या फेरीतील मतमोजणी उशिरा सुरू झाली.
मतमोजणी करीत असताना अनेक मतपत्रिकांवर मत वेगवेगळ्या अंकात नोंदविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गात वाद होत गेले. प्रत्येक टेबलवर सहायक निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांगण्यावरून कुणाचे समाधान होत नव्हते. शेवटी केंद्रेकर यांना तिथे जाऊन सगळे समजावून सांगावे लागत होते.
सहायक निवडणूक अधिकारी म्हणून विभागातील पूर्ण जिल्हाधिकारी होते. त्यातील अनेकांना या मतमोजणीचा अनुभव नव्हता. त्यामुळे सगळी तारांबळ उडाली. प्रत्येक वेळी केंद्रेकर यांना मध्यस्थी करावी लागली.
रात्री १० वाजून २८ मिनिटांनी दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. या फेरीच्या मतमोजणीला ३ तास लागले. केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक भाषेत सूचना केल्यानंतर सगळे कामाला लागले.
आठ तास लागले पहिल्या फेरीच्या मतमोजणीला
पहिल्या फेरीच्या मतमोजणीसाठी आठ तास लागले. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत मतपेट्यांतील मते मिक्सिंग करण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात वेळ गेला. ३५ उमेदवारांच्या मतपत्रिका वर्गीकरण करण्यासाठी उशीर झाला.