पाटोदा: तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. यानंतरही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.पाटोदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. या नुकसानीचे योग्य पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, कॉ. महादेव नागरगोजे, विष्णूपंत घोलप आदींनी उपोषण केले होते. या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंचनाम्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यालाही महिना लोटला व अद्यापही पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. येथे पंचनामे करण्यासाठीही तालुका कृषी अधिकारी बिनवडे हजर नसतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशातच एक तारखेपासून ते रजेवर आहेत. त्यामुळे आता पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणेही जिकिरीचे झाले आहे. यामुळे येथील पंचनाम्यास उशीर करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच अद्याप मिळाले नसल्याचे तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी खासगीत सांगतात. या संदर्भात तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर जिल्हा कृषी अधीक्षक मुळे म्हणाले की, पुन्हा सर्व्हे करण्याचे आदेश अद्यापही मिळालेले नाहीत. त्यामुळे पंचनामे झालेले नाहीत. तसेच येथे ता.कृ.अ. बिनवडे यांना कायम करण्यात येईल.(वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही पंचनामे रखडले
By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST