हणमंत गायकवाड लातूरमनपातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून दृढ होत चालले आहेत. महापौर निवडीच्या काही दिवस अगोदर सावंतांनी थेट अॅड. दीपक सूळ यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला. त्यानंतर दिवाळीत महापौर अॅड. सूळ आणि सावंतांनी एकमेकांना मिठाई भेट देऊन बंद दारांआड गुफ्तगू केले. राजकीय वर्तुळात या भेटीवर अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच काल रविवारी उपमहापौर चाँदपाशा घावटी यांच्या घरी सावंतांना मेजवानी दिली. मनपातील काँग्रेस पदाधिकारी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या प्रेमात तर पडत नाहीत ना, असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे. मनपात काँग्रेसची एकतर्फी सत्ता आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत ‘डिनर डिप्लोमसी’ची संख्याबळामुळे काँग्रेसला गरज पडत नाही. मात्र महापौर सूळ आणि उपमहापौर घावटी यांची शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याशी मैत्री वाढत आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घावटी यांच्या अंबाजोगाई रोडवरील निवासस्थानी सावंतांसोबत तब्बल दोन तास चर्चा झडली. नेमके कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे बाहेर आले नसले तरी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली असल्याची ‘चर्चा’ आहे. सावंतांच्या पाहुणचारासाठी घावटी यांनी रविवारचा पूर्ण दिवस खर्ची घातला. विशेष म्हणजे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना या भेटीची खबर न लागू देण्याची ‘खबरदारी’ त्यांनी घेतली. पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नगरसेवक रवि सुडे, सुनील बसपुरे, तालुका प्रमुख सतीश शिंदे हे यावेळी उपस्थित होते. यापूर्वी घावटी यांच्या मुलाच्या लग्नालाही शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी हजेरी लावली होती. आता दिवाळीच्या फराळाचे निमित्त करून उपमहापौर घावटी आणि सावंत यांच्यातही ‘गुफ्तगू’ झाली आहे.
उपमहापौरांच्या घरी सावंतांना मेजवानी !
By admin | Updated: November 8, 2016 00:10 IST