लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य सरकारने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांचे अंदाजे १ हजार ८६६ कोटी रुपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे़ राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीसाठी तत्त्वत: मंजुरी दिल्याने यापुढे काय निर्णय होतात? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे़ शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्त्वपूर्ण हंगाम असून, बहुतांश शेतकरी खरीप पेरण्यांसाठी बँकांकडून पीककर्ज घेतात़ परभणी जिल्ह्यात ५ लाख हेक्टर हे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे़ जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ४७ हजार शेतकरी असून, ३१ मार्च २०१७ पर्यंत २ लाख ८५ हजार ५८ शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज वाटप केले आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २ लाख ६५ हजार ४१६ शेतकऱ्यांना पीककर्जापोटी २३३३ कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वाटप केले आहे़ त्यातील १२२ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज हे कायम थकबाकीदार शेतकऱ्यांचे आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या खरीप आणि रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांनी १६४९ कोटी रुपयांचे पीककर्ज बँकांना वाटप केले आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ४७ हजार शेतकरी असून, त्यापैकी ० ते १ हेक्टर शेती असलेले १ लाख ३० हजार ७४ आणि १ ते २ हेक्टर शेती असलेले १ लाख २६ हजार ९२७ शेतकरी आहेत तर उर्वरित ९० हजार ९१७ शेतकरी हे २ हेक्टरपेक्षा जास्त शेती असणारे आहेत़ त्यामुळे ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णयाचा लाभ होवू शकतो़ बँकांकडून मागील वर्षीपर्यंत २ हजार ३३३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असल्याने या रकमेच्या ८० टक्के रक्कम माफीची गृहीत धरली तर १ हजार ८६६ कोटी रुपयांची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणे शक्य आहे़ सध्यातरी किती कर्जमाफी झाली हे अस्पष्ट आहे़
१८६६ कोटींची कर्जमाफी शक्य
By admin | Updated: June 13, 2017 00:18 IST