औरंगाबाद:जमिनीच्या वादातून वृध्दाचा कुटूंबियांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. हा भयंकर प्रकार रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला.
नारेगावातील अजीज कॉलनीतील गल्ली क्रमांक २० मध्ये घडला. शेख मंजुर शेख महेमुद (६०) असे मृत वृध्दाचे नाव आहे. विशेष म्हणजे मारहाण केलेल्या कुटुंबियांनी नातेवाईकांना बोलावून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील केली होती. पण वृध्दाचा कुटुंबियांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे भावाला समजताच त्याने या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी धाव घेऊन मृतदेहासह चौघांना ताब्यात घेतले.
नारेगावातील अजीज कॉलनीत राहणारे शेख मंजुर हे आचारी काम करायचे. त्यांना दोन पत्नी असून, एक शहरात तर दुसरी मुंबईला राहते. शेख मंजुर यांच्या नावे शहरात एक प्लॉट आहे. या प्लॉटवरुन दोन्ही पत्नी शेख मंजुर यांच्याशी भांडण करत होत्या. प्लॉटच्या वादातून शनिवारी रात्री पत्नी तस्लीम, मुलगी हिना, परवीन आणि मुलगा सलमान या तिघांनी हात-पाय बांधून डोळ्यात मिरची पुड टाकत बेदम मारहाण केली.
या मारहाणीत शेख मंजुर यांचा मृत्यू झाला. यानंतर आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेख मंजुर यांची पत्नी तस्लीम हिने दिर शेख जफर शेख महेमुद (रा. फकीरवाडी, हर्सुल) यांना मृत्यू झाल्याबाबत माहिती दिली. त्यावरुन शेख जफर यांच्यासह त्यांच्या मुलांनी नारेगावात धाव घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांनी शेख मंजुर यांचा कुटुंबियांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, शेख मंजुर यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.