पैठण : येथील जायकवाडी धरणाच्या पाण्यातील चिलापी प्रजातीचे मृत मासे गेल्या दोन दिवसांपासून तीरावर दिसून येत आहे. मृत माशांचा सडा पाहून पर्यावरणप्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरत आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरण परिसरातील पंप हाऊसजवळ पाण्याच्या किनारी मृत चिलापी मासे दिसून येत असल्याचे पर्यावरणप्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष बजरंग लिंभोरे म्हणाले, जायकवाडी धरणात पाणी वाढत असून, पाण्यात बदल होतो. यात नदी, ओढे, नाल्याचे पाणी सध्या धरणात येत आहे. यामुळे माशांना इजा पोहोचते. तसेच चिलापी माशांचा पिल्ले देण्याचा सध्या हंगाम आहे. त्यामुळे काही मासे मृत पावतात. ते तीरावर येतात.
मत्स्यव्यवसाय विभागाने केला पंचनामासध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून, पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता, पाणी शुद्धतेतील बदल किंवा इतर नैसर्गिक कारणे, यामुळे मासे मरू शकतात, अशी माहिती जाणकरांनी दिली; मात्र अधिकृत तपासणीचे याबाबतचे निष्कर्ष अद्याप आलेले नाहीत. याबाबत माहिती मिळताच मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत माशाचे पंचनामे केले.