केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगावपासून काही अंतरावर असलेल्या कोळी वस्तीत गेल्या चाळीस वर्षांपासून वीज पोहोचलीच नव्हती. दीडशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीतील नागरिकांच्या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्यानंतर सुरू झालेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच येथील नागरिकांच्या आयुष्यातला अंधकार संपला आहे.
वीजपुरवठा सुरळीत झाल्याने कोळी वस्तीतील नागरिकांनी आनंद साजरा केला. वीजपुरवठा केला जावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी महावितरणकडे २०१५ साली कोटेशन घेतले. २० जणांनी एकत्र येऊन कोटेशनची रक्कम देखील भरली. कोटेशन भरून देखील सहा वर्षांपासून वीजपुरवठा होत नव्हता. याप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरण विभाग खडबडून जागा झाला. ‘देर आये, दुरूस्त आहे’ या म्हणीप्रमाणे अखेर कोळी वस्तीवर रोहित्र बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. काही दिवसांतच हे काम पूर्ण होऊन अखेर वस्तीवर लखलखाट झाला.
---
कोट
मागील चाळीस वर्षांपासून मी कोळी वस्तीवर राहत आहे. शेतवस्तीवर लाईट यावी, यासाठी २०१५ मध्ये कोटेशन भरले होते. परंतु, दखल घेतली गेली नाही. त्यानंतर बातमी प्रकाशित झाल्यावर आमची समस्या सुटली आहे, याचा आनंद आहे. - हरिदास सपकाळ, ज्येष्ठ नागरिक.
----
कोट
याच जन्मी घरात लाईट येईल की नाही, असा प्रश्न माझ्यासमोर होता. अख्खे आयुष्य अंधारात घातले. मात्र, ६७ व्या वर्षी का होईना माझ्या डोळ्यांनी घरात लाइट लागलेला पाहिला आहे. याचा मला आनंद झाला आहे. - चंद्रभागाबाई सपकाळ, कोळी वस्ती.