लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुश वाघ
आडूळ (जि. औरंगाबाद) : परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्टरांकडून घेतला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी पैठण तालुक्यातील आडूळ, आंतरवाली खांडी, रजापूर, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ, ब्राह्मणगाव, खादगाव, पारुंडी, गेवराई बु. या गावांमध्ये बस्तान मांडले असून गरीब, अशिक्षित नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. तर याबाबतीत आरोग्य विभागाने कानाडोळा केला असून, बंगाली ड़ॉक्टरांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सुमारे १४ बोगस डॉक्टरांचे फावत चालले आहे.
वैद्यकीय शिक्षणाची नोंदणी अथवा परवाना नसतानासुद्धा बंगाली डॉक्टरांकडून सर्रासपणे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. थंडी तापाचा रुग्ण असल्यास त्याला आरामही पडतो. मात्र, गंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर पुढील उपचारासाठी पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटविले जाते. यासाठी बोगस डॉक्टरांकडून स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने बोगस बंगाली डॉक्टरांचे दवाखाने खेड्यापाड्यात बिनबोभाटपणे सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची लक्षणे असलेले नागरिक भीतीपोटी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल न होता बोगस बंगाली डॉक्टरांकडून सध्या उपचार घेत आहेत. काही डॉक्टर तर मोठी रिस्क घेऊन घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. मात्र, यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाते. या बोगस बंगाली डॉक्टरांच्या काळ्या छायेतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
-----
कारवाई नसल्याने १४ बोगस डॉक्टरांचे वाढले बस्तान
आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सात उपकेंद्र असून, सुमारे ३५ गावातील नागरिक या ठिकाणी उपचारसाठी येतात. परंतु शासकीय आरोग्य सेवा अपुरी पडू लागल्याने आडूळ भागात गेल्या काही दिवसात सुमारे १४ बंगाली डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे. गेल्या काही वर्षात यांच्यावर एकदाही आरोग्य विभागाने कारवाई केली नाही. काही ठिकाणी जिल्ह्यात कारवाई झाली होती, मात्र प्रशासनात त्यांचे लागेबांधे असल्याने त्यांना अगोदरच माहिती मिळाल्यानंतर काही काळ ते पसार झाले होते. त्यानंतर पुन्हा त्यांचा धंदा बिनबोभाट सुरु आहे. तालुका आरोग्य प्रशासनाला ते हप्ते देतात, यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.
कोट --
आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्रात आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. त्या मुळे खेड्यापाड्यात बस्तान मांडलेल्या या बंगाली डॉक्टरांशिवाय नागरिकांनाही पर्याय नाही. दुसरीकडे बंगाली डॉक्टर हे मद्यपान करून रुग्णांवर उपचार करतात. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी.
- शेख शौकत, आडूळ, ग्रामस्थ.
कोट ---
वैद्यकीय शिक्षणाची बोगस प्रमाणपत्र लावून रुग्णांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार गंभीर आहे. संबंधीत भागाकडे मी जातीने लक्ष घालून तपासणी पथक पाठवून बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
----
फोटो ओळ :
१) आडूळ परिसरात बोगस बंगाली ड़ॉक्टरांचे असे गावात ठिकठिकाणी दवाखाने थाटले आहेत.
२) एका रुग्णावर घरीच उपचार करताना बंगाली डॉक्टर.