छत्रपती संभाजीनगर : दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या चेहऱ्याचा वापर करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवसांत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले. यात सायबर पोलिसांनी बँकेला ई-मेलद्वारे पैसे वळते झालेल्या बँक खात्याची माहिती मागवली आहे. सदर पैसे बँक ऑफ महाराष्ट्राच्या गोंदिया व मुंबईस्थित खात्यात गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासोबत काही महिन्यांपूर्वी हा गंभीर प्रकार घडला. २ जुलै २०२५ रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी करून त्याने त्यांच्या बँक खात्यावर दहशतवादी अब्दुल सलामने पैसे पाठवल्याची थाप मारली. तंत्रज्ञानाचा वापर करत नांगरे पाटील यांच्या चेहऱ्याचा वापर करत तक्रारदाराला व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. त्यानंतर विविध कारणांखाली धमकावत तक्रारदाराकडून ७८ लाख ६० हजार रुपये उकळले.
बँक खात्यांची माहिती मागवलीसायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तक्रारदाराचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँकेच्या पवन मेहुरे, करण कुऱ्हे व आशिक नागफुसे नामक बँक खात्यात वळते झाले. ही खाती गोंदिया, मुंबईतील शाखांमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या खातेधारकांची माहिती मागवण्यात आली आहे.
या मुद्यांवर होणार तपास-विश्वास नांगरे यांच्या चेहऱ्याचा वापर करून नागपूर, बीड, कोल्हापूरमध्ये कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला. २०२४-२०२५ मध्ये असे ५ गुन्हे घडले.-तेथील पोलिसांशी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संपर्क साधून तपासाबाबत माहिती मागवली आहे. शिवाय, त्या गुन्ह्यातील पैसे वळते झालेल्या बँक खात्यांची मागवली आहे.-७८ लाख रुपये बँक खात्यात गेल्यानंतर ते अन्य खात्यावर गेले आहेत का, रोख काढली असल्यास कुठून काढली, या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत. खातेधारकांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली जातील, असे पांढरे यांनी सांगितले.