छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम थांबताच गुन्हेगार रिक्षाचालकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आमखास मैदानावर नेऊन एका रिक्षाचालकाने गरीब महिलेला लुटत तिच्या पर्समधील ५० हजार रुपये घेऊन पळ काढला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार महिला अयोध्यानगर येथे कुटुंबासह राहतात. त्या इतरांच्या घरी धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतात. १३ जुलैला त्या शहागंज येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरकुल योजनेसाठी जमवलेली ५० हजार रुपयांची रक्कम त्यांनी पर्समध्ये ठेवली होती. खरेदी झाल्यानंतर त्या गांधी पुतळ्याजवळील रस्त्यावर ओळखीच्या महिलेसोबत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या संभाषणावर लक्ष ठेवून एका रिक्षाचालकाने त्यांना आंबेडकर चौकाकडे नेण्याची तयारी दाखवली. दुपारी १२:३० वाजता त्या रिक्षात बसल्या. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ सांगत प्लॉट खरेदीबाबत विचारणा केली. त्यानंतर, ओळखीच्या व्यक्तीचा प्लॉट दाखवतो, असे सांगत त्यांना आमखास मैदानाच्या दिशेने नेले. रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून प्लॉट काही अंतरावर असल्याचे सांगत महिलेला पायी घेऊन गेला. त्या ठिकाणी पोहोचताच अचानक हाताला झटका देत पर्स हिसकावून रिक्षाचालक पळून गेला. रस्त्यावर येत इतरांची मदत घेत महिलेने घर गाठले.
पोलिस चालक शोधणार का?महिलेने मंगळवारी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिली. सदर रिक्षाचालकाने खाकी रंगाचे कपडे परिधान केले होते. जाड शरीरयष्टी, डोक्यावर चॉकलेटी रंगाची टोपी, लाल डोळे, मोठी लालसर दाढी आणि दात अशा वर्णनाचे चालकाचे हुलकावणीचे स्वरूप होते. रिक्षाच्या मागे वाघबकरी चहाची जाहिरात होती, असे तिने पोलिसांना सांगितले.
मोहीम थांबताच गुन्हेगार पुन्हा सक्रियवाहतूक विभागाने काही महिन्यांपूर्वी गुन्हेगार रिक्षाचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यात २ हजार ४६८ रिक्षाचालकांवर कारवाई करत ५ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला शिवाय, १८२ रिक्षा जप्त केल्या. त्यामुळे काही काळ गुन्हेगार चालक भूमिगत झाले. मात्र, मोहीम थंडावताच पुन्हा नागरिकांना लुटणे सुरू केले.