लातूर : लातूर शहरात गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. गोळीबार, खून, १० लाखांची लूट आणि घरफोड्यांच्या घटना घडल्या असून, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणांचा अद्यापही तपास लागला नाही. परिणामी, पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात एका तरुणावर गोळीबार करून आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या घटनेमुळे लातुरातील व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर खुनाची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर एका खाजगी कंपनीतील रोखपालाच्या हातातील १० लाखांची बॅग दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावत पळ काढला. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्या. एकंदरित, लातूर शहरात गंभीर गुन्ह्यांची टक्केवारी वाढली. परिणामी, शहरातील पोलिसांच्या कर्तव्यावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंद अपार्टमेंटमधील घरे चोरट्यांनी फोडली आहेत. या घटनांत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. एकाही घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध पोलिसांना अद्यापही लावता आला नाही. विशेष म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याचेच घर या चोरट्यांनी फोडण्याचे धाडस केले. रविवारी पहाटे सिग्नल कॅम्प परिसरात छायाबाई सुडे यांचे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून रोख १० हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ९० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
गुन्हेगारीचा टक्का वाढला !
By admin | Updated: November 8, 2016 00:14 IST