पेटवून घेतलेल्या मुलीचा मृत्यू
अमेठी (उत्तर प्रदेश) : ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणून एकाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतलेल्या मुलीचा (१७) शुक्रवारी मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
झमीन ऊर्फ बबलू हा सध्या मुंबईत काम करीत असून तो त्या मुलीवर लग्नासाठी सतत दबाब आणत होता. जियापूर खेड्यात राहत असलेल्या त्याच्या तीन भावांनीही तिला धमकावले होते, असे अधिकारी म्हणाला. यामुळे मुलीने २० नोव्हेंबर रोजी अमेठी जिल्ह्यातील खेड्यात स्वत:च्या घरात पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. तिला लखनौतील बलरामपूर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना अटक झाली असून इतरांचा शोध घेतला जात आहे, असे अधिकारी म्हणाला.
---------------
चार बालिकांची गळा
चिरून झाली हत्या
-----------------
गंभीर जखमी आईला अटक
चंदीगड : हरयाणातील नूह जिल्ह्यातील खेड्यात शुक्रवारी एक ते सात वयाच्या चार बहिणींचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत शुक्रवारी आढळले. मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या मुलींच्या आईने ही हत्या केल्याच्या आरोपावरून तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ही आईदेखील गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
पिपरोली खेड्यात हे हत्याकांड घडले, असे पुनहाना पोलीस ठाण्याचे अधिकारी समरजित यांनी दूरध्वनीवर सांगितले. आईने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास केला जात आहे.
-------------------
बस पेटल्यामुळे तीन
प्रवासी ठार, ६ जखमी
जयपूर (राजस्थान) : शुक्रवारी दिल्लीहून जयपूरला जात असलेली खासगी बस विजेच्या हाय टेन्शन तारांना स्पर्श होऊन पेटल्यामुळे तीन प्रवाशांचा मृत्यू, तर इतर सहा जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
लुबाना खेड्याजवळ ट्रक उलटल्यामुळे जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद पडला होता. त्यामुळे या खासगी बसच्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न केला. बसचा वीजवाहक तारांना स्पर्श झाला व तिने पेट घेतला, असे चांदवाजी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनिता मीना यांनी सांगितले. बसमधील इतर प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. आगीत बस पूर्णपणे जळाली.
----------------