वेतनापासून वंचित
बंगळुरू : बंगळुरूतील महिला सफाई कामगारांनी सहा महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळालेले नाही, अशी तक्रार केली आहे. बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेत भरण्यात आलेल्या माहितीत विसंगती असल्यामुळे हे कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले आहेत. बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्यामुळे वेतन दिले गेले नाही, असे म्हटले.
-----------------
न्यूझीलंडमध्ये १३
पर्यटन संस्था आरोपी
ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : व्हाईट आयलँडवर २०१९ मध्ये उसळलेल्या ज्वालामुखीत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी न्यूझीलंडमधील कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पाहणाऱ्या वर्कसेफ यंत्रणेने १३ पर्यटन संस्थांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या पार्टीजनी पर्यटकांना पर्यटनस्थळी नेताना सुरक्षेचे नियम पाळले नाहीत, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
----------------
बाम, क्रीम बाटल्यांत
१४ लाखांचे सोने
चेन्नई : चेन्नई विमानतळावर चेन्नई कस्टम्स अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला (३३) अडवून त्याची झडती घेतली तेव्हा त्याने बाम आणि क्रीम बाटल्यांत १४ लाख रुपयांचे २८६ ग्रॅम्स सोने उघडकीस आले. त्याच्या जवळील चार नेलकटर्सपैकी दोन सोन्याचे होते.
-------------------
कृत्रिम श्वसनयंत्रणेवर
असलेले झाले महापौर
गोईनिया (ब्राझील) : कोरोनाची बाधा झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आलेले मागुईतो विलेला हे गोईनिया शहराचे महापौर निवडून आले. आम्ही विजयी झालो आहोत; परंतु खरा विजयोत्सव जेव्हा मागुईतो बरे होऊन घरी परततील तेव्हा असेल, असे त्यांचा मुलगा डॅनियल याने सांगितले.
-----------------
दहशतवाद्यांनी केला
लष्करी तळांवर हल्ला
पॅरिस : मालीतील किदाल, मेनाका आणि गावो येथे असलेल्या फ्रेंचच्या लष्करी तळांवर अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी सोमवारी अग्निबाणांचा मारा केला. या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही, असे फ्रान्सच्या दलांच्या प्रवक्त्याने सांगितले.
--------------------
स्काॅटलंडमध्ये १०० टक्के
ग्रीन हायड्रोजनची चाचणी
एडिनबर्ग : स्वयंपाकासाठी आणि घरे उबदार बनविण्यासाठी नैसर्गिक वायूऐवजी १०० टक्के ग्रीन हायड्रोजन वापरण्याची जगातील पहिली चाचणी स्कॉटलंड लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा इंग्लंडमधील
ऑफजेम या ऊर्जा नियामक संस्थेने केली.
---------------
निरुपयोगी मासेमारी
जाळ्यांमुळे प्रदूषण
लखनौ : मासेमारीसाठी निरुपयोगी ठरलेली जाळी गंगा नदीत फेकून दिल्यामुळे प्लास्टीकपासूनच्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे, तसेच अस्तित्व धोक्यात आलेल्या डॉल्फीनसह जलजीवही संकटात सापडले आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने निरुपयोगी जाळे नदीत फेकले जातात. त्यांच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्थाही नाही.
----------------------
अनेकल तालुक्यात
दुचाकीसह रुग्णवाहिका
अनेकल : अनेकल (जि. बंगळुरू) तालुक्यात वाहतुकीशी संबंधित प्रश्न आणि कोरोनाची साथ या पार्श्वभूमीवर दुचाकीला जोडलेली रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आहे. या रुग्णवाहिकेत अंथरुण व बिल्ट ईन ऑक्सिजन सिलिंडर आहे. तालुक्यात ही रुग्णवाहिका अनेकांसाठी जीवनदायी ठरली आहे.
--------------
सात कोटींची फसवणूक
सात जणांना अटक
हैदराबाद : ऑनलाईन गुंतवणूक रॅकेट चालवून २५०० जणांची सुमारे ७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून हैदराबादेत सात जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये लोकांना तुम्हाला गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असे आश्वासन या लोकांनी दिले होते.
---------------------
बिबट्याची ४०० कातडी
जप्त, चार जणांना अटक
बंगळुरू : जनावरांची कातडी आणि नखे जवळ बाळगल्याबद्दल बंगळुरू पोलिसांनी महिलेसह चार जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून बिबट्याची ४०० कातडी आणि ब्लॅकबक, कोल्ह्याची कातडी जप्त, पँगोलीनचे सात नखे, जंगली मांजराचे दोन पंजे आणि वाघाची सहा नखे जप्त केली. हे लोक हा माल विकत घेणाऱ्याची वाट बघत असताना ते पकडले गेले.
-------------------
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण,
१२ फेब्रुवारीला सुनावणी
वॉशिंग्टन : पाकिस्तानी जन्माचा कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाबाबतच्या याचिकेवर अमेरिकेच्या न्यायालयाने १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राणा याचा सहभाग असल्यामुळे भारताने त्याला फरार घोषित केले आहे. राणाला गेल्या जून महिन्यात लॉस एंजिलिसमध्ये अटक करण्यात आली.
-------------------