सेनगाव : नगर पंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मनसे, शिवसेना हे दोन पक्ष सेनगावात किंगमेकर बनले असून काँग्रेस, मनसे, शिवसेना ही युती निश्चित झाली आहे. खबरदारी म्हणून तीन्ही पक्षाचे सदस्य सहलीवर पाठविले आहेत.कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पहिला नगराध्यक्ष कोण होणार? याबद्दल राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे. कुठल्याही स्थितीत भाजप-राष्ट्रवादीची सत्ता येवू द्यायची नाही, याकरिता मनसे, शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होत आहे.या घडामोडीच्या अनुषंगाने काँग्रेस-सेना-मनसे ही युती जवळपास निश्चित झाली आहे. या तीन पक्षांच्या युतीमध्ये सुरूवातीला काँग्रेस पक्षाचा सव्वा वर्षे नगराध्यक्ष त्यानंतर सव्वा वर्षाकरिता शिवसेनेचा नगराध्यक्ष तर अडीच वर्षे मनसेचा उपनगराध्यक्ष असा अलिखीत निर्णय शहरातील तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या तीन्ही पक्षांचे संख्याबळ नऊ होते तर विरोधी बाकावर असणाऱ्या भाजप- राष्ट्रवादी या दोघांचे संख्याबळ आठ होते. सत्ताधारी- विरोधी समिकरणात केवळ एका जागेचा फरक असल्याने कोणताही दगा फटका होवू नये, याकरिता काँग्रेस-मनसे-सेना या पक्षाचे आठ सदस्य बुधवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष होण्यासाठी विलास खाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांच्या पत्नी तारामती देशमुख यांनी दावा केला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. काँग्रेस-मनसे- सेना युती जवळपास निश्चित झाली असली तरी भाजप- राष्ट्रवादीकडून ही बहुमताचा जादूई संख्येकरिता प्रयत्न चालविले जात आहेत. त्यामुळे सेनगाव नगर पंचायतचे राजकारण तापले आहे. (वार्ताहर)
नगरसेवक गेले सहलीवर
By admin | Updated: January 14, 2016 23:14 IST