वैजापूर : शहर व ग्रामीण भागात मंगळवारी (२१एप्रिल ) लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते सकाळपासुनच निर्जन होते. मेडिकल, खासगी दवाखाने व उपजिल्हा रुग्णालय वगळता सर्व व्यवहार संपुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागातही शिऊर, विरगाव पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांनी व्यवहार बंद ठेऊन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे शुकशुकाट होता.
करोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी संपुर्ण जिल्हा बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्याअनुषंगाने वैजापुरचे उपविभागिय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊरचे एपीआय सत्यजित ताईतवाले, विरगावचे एपीआय विश्वास पाटील यांनी नागरिकांचा जमाव व गर्दी होऊ नये म्हणुन सोमवारी सतर्कतेचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये योग्य संदेश पोहचुन त्याचा परिणाम मंगळवारी दिसुन आला.
एरव्ही फुटपाथ वर ठिकठिकाणी बसणारे भाजी विक्रेते, रस्त्याच्या बाजुला असणारे फळविक्रेते, दुधविक्रेते, पिण्याच्या पाण्याचे जार वाहणारी वाहने रस्त्यावरुन गायब झाली होती. त्यांनी बंदमध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या टिक रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. आंबेडकर चौक, जामा मशिद, स्टेशन रोड, राजपूत मढी, गंगापूर रस्ता या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी खंडाळा, शिऊर, गारज आदी भागात भेट देऊन आढावा घेतला. ग्रामीण भागात लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.