औरंगाबाद : जिल्ह्यात अवघ्या महिनाभरापूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येपुढे खाटा अपुऱ्या पडत होत्या. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागत होती; परंतु मे महिन्यात कोरोनाचा विळखा कमी झाला अन् रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने घसरला. त्यामुळे आजघडीला ७० टक्के खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे.
काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या घसरणीला लागली आहे. महिनाभरापूर्वी रोज एक हजारांवर रुग्ण वाढत होते. आता सरासरी ३०० ते ५०० दरम्यान रोज नव्या रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील खाटा रिकाम्या राहू लागल्या आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये सर्वाधिक खाटा रिक्त आहेत. याठिकाणी जवळपास ९० टक्के खाटा रिक्त आहेत. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत होती. जिल्ह्यातील ३३० व्हेंटिलेटरपैकी एकही व्हेंटिलेटर रिकामे नसल्याची स्थिती होती; परंतु आता व्हेंटिलेटरही सहजतेने उपलब्ध होत आहे. घाटीतील अपघात विभागातील गर्दी कमी झाली आहे. महिन्यापूर्वी कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ‘आयसीयू’ खाटा मिळणेही अवघड झाले होते. आता तशी परिस्थिती नाही. कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे; अन्यथा तिसरी लाट त्रासदायक ठरू शकते, अशीही भीती तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.
महिनाभरात अशी बदलली स्थितीऔरंगाबादेत २६ एप्रिल रोजी तब्बल १२ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू होते. अवघ्या महिनाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी घटली. कारण नव्या रुग्णांपेक्षा उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या मंगळवारी ५ हजारांवर आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत.
ऑक्सिजनच्या मागणीत २६ टन घटऔरंगाबादेत महिनाभरापूर्वी रोज ६१ टन ऑक्सिजन लागत होता; परंतु आता ऑक्सिजनच्या मागणीत २६ टन घट झाली आहे. खाजगी रुग्णालयांना २१.३९ आणि शासकीय रुग्णालयांना १४.१७, असा एकूण ३५.५६ टन ऑक्सिजन रोज लागत आहे.
रुग्ण कमी; पण संकट संपलेले नाहीनिर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु रुग्ण कमी झाले म्हणून नागरिकांनी बिनधास्त राहता कामा नये. कारण कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन केले पाहिजे.-डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
खाटांची स्थितीसंस्था- एकूण खाटा - रिक्त खाटाडीसीएच - २,२०३ - १,०८५डीसीएचसी - २,८३७ - १,७६०कोविड केअर सेंटर- ३,१६१ - २,७५६उपलब्ध व्हेंटिलेटर - ६२उपलब्ध ऑक्सिजन बेड - ८५७उपलब्ध आयसीयू बेड - १८८