वैजापूर : कोरोना लसीबाबतची अनेकांच्या मनातील भीती हळूहळू दूर होत असल्याने आता लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी समोर येत आहेत. वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात ७० ते ७५ च्या संख्येने आरोग्य कर्मचारी येऊन लस टोचून घेत आहेत.
१६ जानेवारीपासून उपजिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी केवळ ३३ जणांना लसीकरण करण्यात आले. यावेळी नऊ कर्मचाऱ्यांना मळमळ, अंगदुखीसारखे त्रास झाल्याने इतरांमध्ये भीती पसरली होती. मात्र, लसीकरणानंतर ताप, मळमळचे सामान्य लक्षणे दिसतात अशी माहिती समोर आल्यानंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांमधील भीती दूर झाली आहे. येथील डॉ. दिनेश राजपूत, डॉ. महाडिक व त्यांच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांनी नुकतीच ही लस टोचून घेतली. त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मनोज गव्हाणे म्हणाले, मनात याविषयी वेगळी भावना बनल्याने इंजेक्शन घेतल्यावर थोडा अस्वस्थपणा वाटतो. चेतन राजपूत यांनी थोडी खांदेदुखी वाटल्याचे सांगितले. धनंजय अभंग व लॅबचे पुरुषोत्तम पवार यांना कोणताही त्रास झाला नाही. अंगणवाडीसेविका आशा सोनवणे या लसीबाबत भीतीचे कारण हे मानसिकतेशी संबंधित असल्याचे सांगतात.
कोट
१६ जानेवारीपासून उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २०५ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका व इतरांनी कोरोनाचे लसीकरण करून घेतले आहे. हळूहळू लोकांच्या मनातील भीती दूर होत असून आता लसीकरणासाठी गर्दी होत आहे.
-गजानन टारपे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर.
कोट
बीसीजी लस घेतल्यानंतर जसे, अंगदुखीसारखे वाटते तसेच कोविड लस घेतल्यावर वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, वेदना शमवणारी गोळी घेतली की, सर्व त्रास दूर होतो. वास्तविक लसीविषयी काहींच्या मनात अजूनही शंका असल्याने असे होते. ही लस सुरक्षित आहे.
-गुरुनाथ इंदूरकर, तालुका आरोग्य अधिकारी.