उस्मानाबाद : कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनच्या इमारतीचे हस्तांतरण मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. इमारतीमध्ये दहा ठिकाणी उणिवा असतानाही बांधकाम विभाग उणिवा दूर न करताच हस्तांतरणाचा प्रयत्न करीत असल्याचे संयुक्त पाहणीवेळी उघड झाले. सदर दहा त्रुटींची येत्या १५ ते ३० दिवसात पूर्तता करून या इमारतीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. येथील सामाजिक न्यायभवनची इमारत हस्तांतरणाअभावी पूर्णपणे कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये यावरून मागील काही महिन्यापासून टोलवाटोलवी सुरू आहे. विशेष म्हणजे याचा फटका विद्यार्थ्यांसह या इमारतीत सुरू होणाऱ्या विविध मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयांना सोसावा लागत आहे. ‘लोकमत’ने मागील काही दिवसापासून हा विषय लावून धरल्यानंतर विविध सामाजिक संस्था, संघटनांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत समाजकल्याण अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सदर इमारतीची संयुक्त पाहणी पाहणी करण्यात आली. यावेळी सदर इमारतीच्या कामामध्ये सुमारे दहा प्रकारच्या उणिवा असल्याचे दिसून आले. या उणिवांची पूर्तता सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या पंधरा ते तीस दिवसात करावी. त्यानंतर इमारतीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, लेखी आश्वासनाप्रमाणे अपूर्ण व निकृष्ठ दर्जाची कामे संबंधित विभागाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करून सामाजिक न्यायभवन जनतेसाठी खुले करावे, अन्यथा, सदर मुदतीनंतर भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मिलींद रोकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)४सामाजिक न्याय भवनच्या इमारतीची संयुक्त पाहणी केली असता इमारतीतील अंतर्गत रस्त्याचे काम अर्धवट असल्याचे आढळून आले. इमारतीभोवतालच्या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. इमारती सभोवताली वृक्षारोपणही झालेले नाही. इमारतीसभोवतालचा परिसर स्वच्छ केलेला नाही. इमारतीच्या पाठीमागील ड्रेनेजचे झाकण व्यवस्थित बसविण्यात आलेले नाही. इमारती सभोवतालीच्या रस्त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे. इमारतीसभोवतालच्या गटारीवरती झाकण बसविलेले नाही. या बरोबरच विद्युत जनित्राचे झाकणही बसवावयाचे शिल्लक आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील दिव्यांना विद्युत कनेक्शन दिलेले नाही. याबरोबरच बोअरवेल ते पाण्याच्या साठवण हौदापर्यंत पाईपलाईन करण्यात आली नाही.
‘बांधकाम’चीच आडकाठी
By admin | Updated: December 11, 2014 00:41 IST