औरंगाबाद : मनपा निवडणुकीत बहुचर्चित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने सर्वच्या सर्व ११३ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या उमेदवारांचे पक्षाने तिकीट पक्के केले, त्यांना बोलावून बी फॉर्म देण्यास आज दुपारपासून प्रारंभ करण्यात आला. हे काम आमदार सुभाष झांबड यांच्या सिडको निवासस्थानातून सुरू झाले. याठिकाणी निरीक्षक सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व आ. सुभाष झांबड हे स्वत: उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बी फॉर्म वाटपाचे काम सुरू होते. या प्रतिनिधीशी बोलताना सचिन सावंत व आ. सुभाष झांबड यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये कुठेही मतभिन्नता वा गटबाजी नाही. आम्हाला सर्व वॉर्डांतून उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकिटे पक्की करण्यात आली व त्या संबंधित उमेदवारांना निरोप देऊन बोलावून घेण्यात आले व त्यांना बी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. आ. झांबड यांच्या निवासस्थानासमोर उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळाली. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, अॅड. सय्यद अक्रम व राजकुमार जाधव आदी मंडळी सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख यांना सहकार्य करीत होती. अर्ज भरल्यानंतर उद्या दुपारी आम्ही सर्व उमेदवारांची नावे जाहीर करू, असे झांबड यांनी सांगितले. १० ते १५ जागांचा वाद सुरू आहे. त्यातल्या काही जागांवर युवक काँग्रेसने दावा केला आहे. हा वाद आम्ही लवकरच संपवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी यादी आधीच जाहीर न करता तिकीट पक्के झालेल्या उमेदवाराला बी फॉर्म देण्याच्या या पद्धतीमुळे संभाव्य बंडखोरीला आळा बसेल, असे मानले जात आहे.
काँग्रेसही ११३ जागा लढविणार
By admin | Updated: April 7, 2015 01:29 IST