राजेश भिसे , जालनाजालना नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर युती आणि आघाडीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत शुक्रवारी तब्बल तीन तास बैठक झाली. पाच जागांवरुन मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीसाठी दोन्ही पक्षांचे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. तर शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी युतीबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.जालना शहरातील वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार ६० वॉर्ड झाले असून, ३० प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन वॉर्ड याप्रमाणे शहराची रचना करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यंदा पालिकेत पन्नास टक्के महिलांची संख्या राहणार आहे. तसेच नगराध्यक्ष पद हेही सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव होऊन तेही जनतेतून निवडले जाणार असल्याने प्रस्थापितांनी चाचपणी सुरु केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज विक्री आणि मुलाखतींचा कार्यक्रमही सुरु केला आहे. ‘पॉकेट’ असलेल्या वॉर्डबद्दल राजकीय पक्ष निश्चिंत असले तरी युती आणि आघाडीवरच पुढील राजकीय गणिते सत्तेच्या सारीपाटात महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी आघाडी करुन जागा वाटपाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २० जागांची मागणी केली तर काँग्रेस नेत्यांनी १५ जागांवर सहमती दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीने दावा केलेल्या पाच जागांवर काँग्रेसचे सिटींग नगरसेवक असल्याने पेच निर्माण झाला. यातून मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो का यावरही बराच खल झाला. जवळपास ३ तास चर्चा झाली मात्र तोडगा निघू न शकल्याने चर्चा फिस्कटली आणि आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही. आगामी दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल, असा दावा दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी लोकमतशी बोलताना केला. बैठकीस काँग्रेसतर्फे माजी आ. कैलास गोरंट्याल, विजय चौधरी, राम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शहराध्यक्ष राजेश राऊत, बबलू चौधरी उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आघाडी करण्यासह जागा वाटपाबाबत बैठक झाली. काही जागांवर मतभेद निर्माण झाले असले तरी ही केवळ चर्चेची पहिलीच फेरी असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या भागांत काम केले आहे. त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. आगामी काही दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय होईल या दिशेने वाटाघाटी केल्या जातील. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण कार्यकर्त्यांना न्याय देण्यास पक्षाचे प्राधान्य राहील, अशी भूमिका माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना मांडली. शकुंतला नगर, लक्ष्मीनारायण पुरा, इन्कमटॅक्स कॉलनी, मोदीखाना आणि पाणीवेस परिसर या वॉर्डांवर राष्ट्रवादीने दावा केला. तर याच वॉर्डांमध्ये सद्यस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक आहेत. या भागांतून काँगे्रस उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला. तर याच वॉर्डांतून पाच वर्षे राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तयारी केली होती. आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते परिस्थिती कशी हातळतात, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली!
By admin | Updated: October 22, 2016 00:31 IST