लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी आदी पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसतर्फे मनपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीमभैया पटेल यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येईल.आझाद चौैक ते रोशनगेटपर्यंतच्या पाच वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाला यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली. तीन दिवसाआड पाणी द्या, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे पटेल यांनी सांगितले.इब्राहीम पटेल यांनी चार दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला आंदोलानाचे पत्र दिले आहे. सध्या शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. प्रशासन ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत पाण्यासाठी आंदोलन करू नये, अशी विनंती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी एका पत्राद्वारे पटेल यांना केली आहे.आंदोलन होणारच....पाच वॉर्डांमध्ये तब्बल ५० ते ६० हजार नागरिक राहतात. पाण्यासाठी आबालवृद्धांचे मोठे हाल होत आहेत. सत्ताधारीही या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहेत. मनपा आयुक्तांचा आम्ही आदर करतो; पण बुधवारचे आंदोलन होणार, असे पटेल म्हणाले.
पाण्यासाठी काँग्रेसचा आज मनपावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:05 IST