औरंगाबाद : प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कन्सेप्ट फार्मास्युटिकल्स कंपनी बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिले. ‘कन्सेप्ट फार्मा’चा वीज व पाणीपुरवठा तोडण्याच्या सूचनाही महावितरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) देण्यात आल्या आहेत. या कारवाईने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील सूत्रांनी सांगितले की, कन्सेप्ट फार्मा या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कित्येक महिन्यांपासून कार्यान्वित नव्हता. त्यामुळे कंपनीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत होती. ही बाब कंपनीच्या लक्षात आणून देण्यात आली, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सुधारणा करण्याबाबत कंपनीला वर्षभरात अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी गांभीर्य दाखविले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गेल्या आठवड्यात अचानक तपासणी केली असता, कंपनीच्या परिसरातच जेसीबीने खड्डे खोदून कालबाह्य औषधींची विल्हेवाट लावली जात असल्याचे आढळून आले होते.पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने कंपनी बंद करण्याचे आदेश बुधवारी (दि.१३) बजावण्यात आले.कन्सेप्ट फार्मा बंद करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई अन्यायकारक असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष (आॅपरेशन्स) एन. बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी बंद करण्याची नोटीस ११ एप्रिल रोजी तयार करण्यात आली व आमच्यापर्यंत १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहानंतर ती पोहोचविण्यात आली. गुरुवार व शुक्रवारी शासकीय सुट्या असल्याने या कारवाईविरुद्ध दाद मागण्यास संधी मिळू नये, या हेतूनेच १३ रोजी सायंकाळी उशिरा नोटीस बजावण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली तपासणी ही फक्त औपचारिकताच होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीस आम्ही आव्हान देणार असून, निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदूषणामुळे ‘कन्सेप्ट फार्मा’अडचणीत
By admin | Updated: April 15, 2016 01:51 IST