औरंगाबाद : मेडिकव्हार हाॅस्पिटलमध्ये ७१ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यावर अर्धा किलोचा मांसाचा गोळा होता. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, त्यांनी मेडिकव्हर हाॅस्पिटल गाठले. डाॅक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्या महिलेला जीवदान दिले.
गळ्यावर थायरॉईडचा ५०० ग्रॅमचा मोठा गोळा असलेल्या ७१ वर्षांच्या महिलेला दैनंदिन कामात अडथळा होत होता, तसेच श्वसनाचा त्रास होत असल्याने तिने अनेक डाॅक्टरांकडून उपचार घेतले. त्या डाॅक्टरांनी मुंबई-पुणे येथे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काही नातेवाइकांनी मेडिकव्हर हाॅस्पिटलला जाण्याचा सल्ला दिल्याने नातेवाइकांनी रुग्णाला डॉ.स्वरूप बोराडे यांची भेट घडविली. त्यांनी महिलेला शस्त्रक्रियेची आवश्यकता असून, सहमती असल्यास इथे करू शकतो, असे सांगतिले. मेंदूला जाणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या ग्रंथीच्या जवळ असतात. आवाज जाण्याची शक्यता असते. पॅरा-थायरॉईड ग्रंथी थायरॉईडशी संलग्न असतात, त्यांना इजा झाल्यास बोटांना मुंग्या येणे, बोटे वाकडी होणे या व्याधी होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींची योग्य काळजी घेऊन, या कुठल्याही अडचणी न येऊ देता, ही जटिल शस्त्रक्रिया डॉ.स्वरूप बोराडे यांनी पार पाडली. टीममध्ये डॉ.दिनेश लहिरे, डॉ.अभिजीत कबाडे, डॉ.सुनील मुरके व डॉ.आनंददीप अगरवाल यांचा समावेश होता, असे केंद्रप्रमुख डॉ.नेहा जैन यांनी सांगितले.