लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गोदावरी पात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी पाहून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी संताप व्यक्त करून याबाबत महापालिकेचे आयुक्त व महापौरांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या़ गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरीचे शुद्धीकरण व्हावे, नाल्यांचे सांडपाणी सोडण्यात येऊ नये, अशी नांदेडकरांची मागणी आहे़ आ़ हेमंत पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला़ मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला़ हे प्रकरण आज पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या समोर आले़ तेव्हा ते चांगलेच संतापले़ शिवसंपर्क अभियानातंर्गत आ़ हेमंत पाटील यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत शुक्रवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नल्लागुट्टा चाळ, गोवर्धनघाट, डंकीन आदी भागाला भेटी देऊन तेथील विविध समस्यांची पाहणी केली़ मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच गोदावरी पात्रात सुरू असलेले नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह याबद्दल पर्यावरणमंत्री कदम यांनी नापसंती व्यक्त केली़ गोदावरी नदीचे पात्र हे नांदेडकरांसाठी पवित्र स्थान असून देश- विदेशातील शीख बांधव या ठिकाणी येतात़ गोदावरी तटावरील विविध घाटांवर सर्वत्र दूषित पाणी दिसून येत आहे़ आ़ हेमंत पाटील यांनी वर्षभरापूर्वी पर्यावरणमंत्र्यांकडे तक्रार केली होती़ मात्र मनपाने त्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही़आज पर्यावरणमंत्र्यांसोबत आ़ पाटील तसेच संतबाबा बलविंदरसिंघ आदी उपस्थित होते़ शहरातील नाल्याचे पाणी नदीत का सोडण्यात येत आहे, याबाबत यापूर्वीच महापालिकेला नोटीस दिली होती़ अद्यापही कारवाई न झाल्याने आयुक्त व महापौरांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या़
आयुक्त, महापौरांवर गुन्हे दाखल करा-पर्यावरणमंत्री कदम यांची सूचना
By admin | Updated: June 10, 2017 00:09 IST